सैनिक स्कूल आंबोली येथे ‘उन्हाळी साहसी व व्यक्तिमत्व विकास’ शिबिराचे उद्घाटन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमध्ये ‘उन्हाळी साहसी व व्यक्तिमत्व विकास’ या पहिल्या शिबिराचे आज उत्साहात उद्घाटन झाले. या साहसी शिबिरास महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन संचलित ‘द कर्नल्स अकॅडमी फॉर ॲडव्हेंचर अँड ॲरो स्पोर्ट्स’ आणि ‘सैनिक स्कूल, आंबोली’ यांच्या संयुक्त विद्यमाने या निवासी साप्ताहिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिला टप्पा १८ एप्रिल ते २४ एप्रिल आणि दुसरा टप्पा २५ एप्रिल ते १ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
१० वर्षांवरील मुला-मुलींसाठी असलेल्या या शिबिरात साहसी खेळांसोबतच मानसिक आणि शारीरिक विकासावर भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्यानेसाहसी उपक्रम: रॉक क्लायंबिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, माउंटेनिअरिंग, जंगल सफारी आणि ट्रेकिंग. रायफल शूटिंग, कराटे, मार्शल आर्ट, ऑब्स्टॅकल ट्रेनिंग आणि रायफल शूटिंग. नेतृत्व मार्गदर्शन, ग्रुप डिस्कशन, डिबेट आणि बर्ड व प्लांट ऑब्झर्व्हेशन. शारीरिक कवायत, योगा आणि प्राणायाम यांचा समावेश आहे.
आंबोलीतील जैवविविधतेचा अभ्यास, सह्याद्रीच्या कडेकपारीतील साहसाचा अनुभव आणि स्थानिक ‘रानमेव्याची’ चव चाखण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहून वनभोजन व सांस्कृतिक शेकोटी कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ जाण्याचा अविस्मरणीय अनुभव या शिबिरातून घेता येईल.
सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव श्री. जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ आणि मुख्याध्यापक श्री. नितीन दशरथ गावडे यांनी केले आहे.


