सावंतवाडीत वादळी पावसाचे धुमशान … शहरात अनेक ठिकाणी नुकसान
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी शहरात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वीजांच्या गडगडाटासह वाऱ्यांमुळे झाडे पडण्यासह पत्र्याची शेड उडून गेल्याचे प्रकार सावंतवाडीत घडले.
गुरूवारी सायंकाळपासून तालुक्यात वीजांचा लखलखाट सुरू होता. रात्री १२ च्या सुमारास शहरात वादळी वाऱ्याने थैमान घातले. या वाऱ्यात मोती तलाव, राजवाडा, शिव उद्यान परिसरातील झाडे पडण्यासह रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्र्याचे छत उडून गेले. एसपी कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडले. सुदैवाने यात कोणाला गंभीर इजा पोहचली नसल्याचे समजते. प् रात्री जवळपास २ तास विद्युत पुरवठा खंडीत होता. शहरात आणखीनही काही ठिकाणी या वाऱ्याने नुकसान केल्याचे समजते.
दरम्यान, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यात मोठे नुकसान झाले आहे. जुन्या इमारतीच कौलारू छत तसेच नवीन इमारतीचे पत्रे तुटून पडला आहे. वाऱ्याचा वेग एवढा होता की तीन मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागील बाजूला जाऊन पडले. रामेश्वर प्लाझा येथील काचीच्या खिडक्या फुटून नुकसान झाले. राजवाडा येथील नारळाचे झाड पडून संरक्षक कठड्याचे व शिव उद्यानमधील झाडाचे नुकसान झाले. उभाबाजर येथील छताचा पत्रा शेजारील इमारतीच्या अंगणात जाऊन पडला. आरपीडीच्या जाहिरात कमानीचही नुकसान झाले. सुदैवाने ही घटना रात्रीच्यावेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.


