आमदार दीपक केसरकर व नगराध्यक्षांनी केली नुकसानग्रस्त भागाची पहाणी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
गुरुवारी सावंतवाडी शहरात रात्री वादळी वारा व पावसाने थैमान घातल्यानंतर झालेल्या नुकसानाची पाहणी आज शुक्रवारी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केली. त्यांनी सबनीसवाडा, मोती तलावसह रामेश्वर प्लाझा, श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. घटनास्थळी जात नुकसानग्रस्त भागाची पहाणी त्यांनी केली. शहरात तब्बल २१ ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून याबाबत तहसीलदार यांना ताबडतोब पंचनामा करायला सांगून चक्रीवादळाच्या प्रमाणका खाली नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मदत करण्याच्या सुचना देणार असल्याचे आमदार केसरकर यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले, विशेष बाब म्हणून मदत देण्याच्या सुचना तहसीलदारांना मी करणार आहे. त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. महावितरणचा खंडित विद्युत पुरवठा देखील लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येईल. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तळकोकणातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान प्रश्नी पुनश्च लक्ष वेधणार आहे. मात्र, पावसाचा वाढता जोर अन् नुकसान बघता शेतकऱ्यांना आता अधिकची मदत मिळण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीकडेही लक्ष वेधणार असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली.
दरम्यान, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले म्हणाल्या, शहरातील नुकसानीची पाहणी आम्ही केली आहे. लोकांना मदत करण्यासाठी आमची टीम तैनात आहे. नगरसेवक नुकसानीची माहीती आम्हाला देत आहेत. महावितरण सोबत बैठक घेत पावसापूर्वी झाडाच्या फांद्या हटविण्यासाठी लक्ष वेधणार आहे. आमदार दीपक केसरकर यांचे आम्हाला सहकार्य लाभत असून पालकमंत्री नितेश राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असून ते निश्चितच शहरातील लोकांना मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री पंचम खेमराज महाविद्यालयासह शहरात झाड पडून नुकसान झालेल्या भागाची पाहाणी त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, युवराज लखमराजे भोंसले, नगरसेवक अजय गोंदावळे, सुकन्या टोपले, प्रतिक बांदेकर, न.प.चे वैभवकुमार अंधारे, दीपक म्हापसेकर, जयप्रकाश सावंत, हेमंत बांदेकर, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.


