माझी आमदारकी भाजपच्या नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित … आमदार प्रमोद जठार
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
पुढची ६ वर्ष शतप्रतिशत भाजपसह कोकणच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. आता सरकारचा दुवा बनून पालघर ते सावंतवाडी पर्यंत विकास कामांचा पाठपुरावा करणार आहे. माझी आमदारकी ही भाजपच्या नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित असून, नेत्यांच्या आशीर्वादाने जनहितार्थ काम करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथे केले.
सावंतवाडी येथील भाजपच्या कार्यालयाला आमदार जठार यांनी आज गुरुवारी भेट दिली. यावेळी सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांकडून आमदार जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार जठार म्हणाले, देशात भाजपला कार्यकर्त्यांच्या ताकदीवर यश मिळाले असून १०० वर्षांच्या त्यागाचे हे फळ आहे. माझ्या पदाचा फायदा हा पक्षाला व जनतेला करून देण्यासाठीच माझा भर आहे. मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार, पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून पालघर ते सिंधुदुर्गचा समन्वयक म्हणून मी काम करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपा पदाधिकारी श्री. विशाल परब यांच्या कार्यालयातील दुसऱ्या स्वागता बाबत विचारले असता श्री. जठार म्हणाले, आमच्यात गट नाहीत, भाजप हाच आमचा गट आहे. प्रत्येक ठिकाणी माझे स्वागत होत आहे. राष्ट्र प्रथम हा विचार जपणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. कोकणातील रोजगारावर आमचा भर आहे. येत्या काळात कोकणात रोजगार उभा राहिलेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सगळेच भाजपात येऊन जयघोष करताना दिसतील. असे आमदार जठार म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, भाजप सरचिटणीस महेश सारंग, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, लखमराजे भोंसले, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, ॲड. परिमल नाईक, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, रवी मडगावकर, नगरसेविका नीलम नाईक, सुनिता पेडणेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


