देवगडातील शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल दहावी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न
सिंधुदुर्ग / राजू तावडे
जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत आणि शालेय जीवनातील सुवर्णक्षण पुन्हा एकदा अनुभवत शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल देवगडच्या दहावी बॅच १९८४-८५ मधील माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा रविवार दि. १७ मे रोजी वारगाव येथील सीताई रिसॉर्टमध्ये उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचा धागा आजही तितकाच घट्ट असल्याची अनुभूती दिली. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून सुमारे ७५ माजी विद्यार्थी या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थितांनी स्वतःची ओळख करून देत मनोगते व्यक्त केली. अनेकांच्या भावना शब्दांतून व्यक्त होत होत्या, तर काहींच्या डोळ्यांत जुन्या आठवणींचे अश्रू दाटून आले होते.
कार्यक्रमात विविध बौद्धिक खेळ, मेंदू विकास उपक्रम, गाणी, कविता, हास्यविनोद आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण आनंदमय झाले. जुन्या आठवणींना उजाळा देताना शालेय जीवनातील अनेक किस्से रंगले आणि उपस्थित सर्वजण पुन्हा एकदा आपल्या बालमैत्रीच्या विश्वात रमून गेले.
विशेष म्हणजे, वयाच्या उत्तरार्धातही सर्वांनी दाखवलेला उत्साह, ऊर्जा आणि सहभाग पाहून “मनाने आपण आजही तरुण आहोत,” अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती. अनेक वर्षांनी एकत्र ८ ते १० तास घालवण्याचा अनुभव सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
आजच्या धावपळीच्या जीवनात असे काही क्षण आयुष्याला नवी उमेद देऊन जातात, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या नात्यांना नव्याने बळ मिळाले आणि पुढील भेटींची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण झाली.
“मैत्री ही काळानुसार जुनी होत नाही, तर अधिक मौल्यवान बनत जाते,” याची सुंदर अनुभूती देणारा हा स्नेहमेळावा उपस्थितांच्या मनात कायमचे घर करून गेला.


