पावसाळ्यापूर्वीच वीज सेवेवर प्रश्नचिन्ह; २५ मे रोजी कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांचा “जाब विचार आंदोलन”.
सिंधुदुर्ग– मनोज घाटकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वारंवार खंडित होणारी वीज सेवा, कमी दाबाचा पुरवठा, तासन्तास सुरू असलेले लोडशेडिंग, तक्रारींना मिळणारा विलंबित प्रतिसाद आणि दुरुस्ती कामांतील हलगर्जीपणा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पावसाळा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नसतानाही जिल्ह्यात अनेक भागांत वीज पुरवठा विस्कळीत होत असल्याने आगामी पावसाळ्यात वीज विभाग सेवा देण्यास सक्षम आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कुडाळ येथील जिल्हा अधीक्षक अभियंता कार्यालयात “जाब विचार आंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांनी आपल्या परिसरातील समस्यांची लेखी तक्रार घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी सांगितले की, “दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येतात, असा दावा वीज विभागाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात अवकाळी पावसातच अनेक ठिकाणी तारा तुटणे, ट्रान्सफॉर्मर बंद पडणे, झाडांच्या फांद्या तारांवर कोसळणे आणि दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित राहणे अशा समस्या सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होणार नाहीत याची खात्री विभागाने द्यावी.”
समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, “ग्रामीण भागात अनेक वेळा तक्रार करूनही तत्काळ दखल घेतली जात नाही. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. वीज विभागाने तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना जाहीर कराव्यात.”
सोशल मीडिया प्रमुख मनोज घाटकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “फक्त सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून उपयोग नाही. प्रत्येक नागरिकाने आपल्या भागातील समस्यांची लेखी माहिती घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे, जेणेकरून प्रशासनाला वास्तव परिस्थितीची जाणीव होईल.”
या आंदोलनाद्वारे वीज विभागाच्या कामकाजाचा जाब विचारत आगामी पावसाळ्यापूर्वी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.


