धुळ्यात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात सहा जणांचा मृत्यू
धुळे/
येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला असून यामध्ये 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहे. याठिकाणी एक रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये जोरदार धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती”
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लळिंग घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. घाटातून जात असताना एका वेगवान डंपरने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्याच वेळी पाठीमागून येणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स बस देखील या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन आदळली. तीनही वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने महामार्गावर एकच आक्रोश निर्माण झाला.”


