तिलारी बॅकवॉटर मध्ये बुडालेल्या बेळगावातील युवकाचा मृतदेह रात्री उशिरा सापडला
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
मूळचा हाजगोळी येथील रहिवासी आणि सध्या गणेशपूर-बेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या युवकाचा हाजगोळी (ता. चंदगड) येथील चाळोबा देवालय टेकडी परिसरातील तिलारी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
ओमकार नामदेव पाटील (वय 24) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. ओमकार हा गणेशपूर येथील युवक मित्रांसह चाळोबा टेकडी परिसरात गेला होता.
जेवण केल्यानंतर मित्रांसह पाण्यात पोहण्यास उतरला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ओमकार बुडाल्याने सोबतच्या दोन्ही मित्रांनी पाण्याबाहेर येत आजूबाजूला कोणी वाचविण्यासाठी आहे काय पाहिले. मात्र परिसरात कोणीच नसल्याने त्यांनी हाजगोळी येथे माहिती दिल्यानंतर मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली”
युवक पाण्यात पडल्याची माहिती हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन टीमला प्राप्त झाली. माहिती मिळताच कोणताही विलंब न करता रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर युवकाचे कपडे व बोट किनाऱ्यावर दिसत होते, मात्र तो नेमका कोणत्या ठिकाणी पाण्यात बुडाला होता याची कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती. अंधार, खोल पाणी आणि मर्यादित माहिती यामुळे शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. तरीही आमच्या जिगरबाज रेस्क्यू जवानांनी हार न मानता तात्काळ पाण्यात शोधमोहीम सुरु केली. रात्री १०.१५ वाजता मृतदेह आढळला.


