जिल्ह्यातील वृक्षतोड कोणाच्या आशिर्वादाने? भाजप पदाधिकाऱ्यांना डॉ. परुळेकर यांचा सवाल
सिंधुदुर्ग / राजू तावडे
पर्यावरण दिनी ५ जून रोजी जिल्ह्यात जनकल्याण अभियान अंतर्गत “एक झाड आईच्या नावाने” असा जिल्ह्याभरात ४० हजार झाडे लावण्याचा भीमगर्जनायुक्त कार्यक्रम जिल्हा भाजपने जाहीर केला आहे. आज जिल्ह्यात जागोजागी विशेषतः सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जैवविविध जंगलांमध्ये जी बेसुमार वृक्षतोड होत आहे ती वृक्षतोड कोणाच्या आशिर्वादाने होत आहे? याचा पाठपुरावा भाजप जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते करणार आहेत काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
नियोजित शक्तीपीठ महामार्ग ज्या तेरा गावांतून प्रस्तावित आहे त्या गावांमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे? याचा विचार ते करणार आहेत काय?
मुंबई गोवा महामार्ग बांधकाम चालू असताना सात आठ वर्षांपूर्वी बांदा ते खारेपाटण दरम्यान लाखो झाडांची कत्तल झाली त्यापैकी एकतरी झाड आज उभे आहे काय? असा सवाल डॉक्टर परुळेकर यांनी केला आहे. वृक्षारोपण हे अत्यावश्यक आहे पण मोठमोठे वृक्ष वाचवणे हे त्याहून महत्त्वाचे आहे असा सल्ला डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिला आहे.


