पक्षासाठी मेहनत घेऊनही खच्चीकरण सावंतवाडी भाजपा नगरसेविका मोहीनी मडगावकरांनी कार्यकारणीच फोडली..
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी मधील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीने लडकाफडकी राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेविका मोहिनी मडगावकर आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत दुफळीमुळे हा राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा दिल्याने हा पक्षाला मोठा हादरा मानला जात आहे.
मोहिनी मडगावकर यांनी मिडीयाशी बोलताना पक्षावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ‘माझा कार्यकाळ पूर्ण झाला नव्हता, मात्र मला सांगण्यात आलं की तुम्ही पद सोडा, हे पद आम्ही दुसऱ्या कुणाला देऊ. माझं हे म्हणणं आहे की, कार्यकारिणी बदलायची असेल तर संपूर्ण जिल्ह्याची बदला आणि माझी पण बदला. फक्त सावंतवाडीचं बदललं तर लोक विचार करतील की यांचच पद का गेलं. मी माझ्या पदाला न्याय दिला आहे. आंबोलि, बांदा कार्यकारिणी काहीही काम करीत नसतानाही मी एकटीने शहर कार्यकारिणीमार्फत महिला भाजपा सांभाळली… मी नगरसेविका म्हणून काम करत आहे. मी अनेक कार्यक्रम यशस्वी करून दाखवले आहेत.
पुढे बोलताना मडगावकर यांनी, ‘संपूर्ण कार्यकारिणीनेही राजीनामा दिला आहे. मला सोबतच्या महिला सांगत होत्या की राजीनामा देऊ नका, तुम्ही राजीनामा दिला तर आम्ही इथे काम करणार नाही. तुम्ही आहात म्हणून इथे आम्हाला मान सन्मान मिळत आहे. काही लोक बाहेरू येतात आणि इथे हस्तक्षेप करतात. आमचे जिल्हाध्यक्ष त्यांचं ऐकून चुकीचा निर्णय घेतात, हे चुकीचं आहे. त्यांनी कुणीतरी सांगत आहे की हिला काढून टाका, दुसऱ्याला पद देऊया हे करण चुकीचं आहे’ असं म्हणत पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे.


