न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हजारो रुपये खर्च करूनही स्मिता परब पाण्यासाठी वंचित, नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभार

 

​सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सेवानिवृत्त म्हाडा कर्मचारी यांच्या पत्नी स्मिता परब यांना मार्च महिन्यापासून घरात पाणी मिळत नसल्यामुळे मानसिक वेतना भोगाव्या लागत आहेत. सध्या घरात पाणी नसल्यामुळे त्या नाइलाजाने एका हॉटेलमध्ये राहत आहेत. प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्यामुळे परब यांना हजारो रुपये खर्च करायला लाऊन हि मार्च महिन्यापासून त्यांना एक थेंबही पाणी मिळाले नाही. ही बाब अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. दरम्यान याबाबत नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्याशी संपर्क साधला असता उद्या सोमवारी आपण प्रत्यक्ष पाहणी करून त्या महिलेला पाणी देण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन त्यांनी दिले.
​मिळालेल्या माहितीनुसार, झिंरंगवाडी म्हाडा कॉलनी येथे म्हाडाचे सेवानिवृत्त कर्मचारी सदाशिव परब हे राहत होते. सन २०२३ मध्ये ते मयत झाले. त्यानंतर त्यांची पत्नी येथे राहत आहेत. त्यांच्या घरामध्ये नगरपरिषदेचे नळ कनेक्शन आहे व आजपर्यंत नळ योजनेचे सर्व बिल त्यांनी पूर्णपणे अदा केलेले आहे. त्या काही महिने मुंबई येथे राहत होत्या. मार्च महिन्यात त्या घरी परतल्यानंतर घरातील नळाला पाणी येत नसून नळ कनेक्शन बंद झाल्याच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी व त्यांच्या मुलीने वारंवार नगरपरिषद कार्यालयात संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची संपर्क साधला मात्र आजपर्यंत त्यांना पाणी मिळाले नाही.
सावंतवाडी नगरपरिषदेकडून पाणी पुरवठा योजनेचे नळ कनेक्शन मिळण्यासाठी लाखो यातना भोगून आणि हजारो रुपये खर्च करूनही अद्याप पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्याने, स्मिता परब यांनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात त्यांनी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव यांच्यासह नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या अनेकदा भेटी घेतल्या, परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही.
​ त्यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक मुरगुड यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च सांगितला होता. त्यानंतर परब यांनी स्वतः कामगार लावून नळपाणी लाईनसाठी खोदकाम करून घेतले.
​या नळपाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी नगरपरिषदेत अनधिकृतरीत्या ३ हजार ५०० रुपये भरले. तरीही खोदाई व इतर असे वेगळे पाच हजार रुपये त्यांच्याकडून घेण्यात आले. कामगार खर्च, साहित्य आणि खोदकामासह नळ कनेक्शन जोडेपर्यंत त्यांनी आतापर्यंत एकूण १८,३०० रुपये खर्च केले आहेत. एवढा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून आणि लोकप्रतिनिधींकडे उंबरठे झिजवून अखेर दोन दिवसापूर्वी नळ कनेक्शन जोडण्यात आले. मात्र तरीही दुसऱ्या दिवशी नळाला पाणी आलेले नाही. आणि कनेक्शन बंद आहे.
​नगरपरिषदेच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे स्मिता परब यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. “पैसे भरून आणि स्वतःच्या खर्चाने खोदकाम करूनही जर पाणी मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधारी तात्काळ लक्ष देऊन हा पाणीप्रश्न सोडवणार की या महिला ग्राहकाला आणखी यातना सहन कराव्या लागणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांचे ही लक्ष आज या प्रकरणाकडे वेधण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाने नगरपरिषदेचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. जुनी लाईन असतानाही लाईन माहित नाही असे सांगून नवीन लाईनसाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून खोदकाम करून त्या महिलेला आर्थिक भुर्दंड घातला गेला. एवढे करूनही पुन्हा जुनेच कनेक्शन जोडून देण्यात आले. मात्र तरीही अद्याप पर्यंत पाणी घरामध्ये नीट येत नाही ही शोकांतिका आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे