एनसीसी कॅडेट कु.साहीश याने नेमबाजी मध्ये सुवर्ण पदक पटकाविले
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
एनसीसी संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर ग्रुप शूटिंग चॅम्पियनशिप 2026 राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सावंतवाडी च्या एसपीके कॉलेजच्या एनसीसी कॅडेट कु. साहीश दिगंबर तळणकर याने सुवर्ण पदकाचा लक्षवेध केला.
साहीश दिगंबर तळणकर हा मूळ कुडासे दोडामार्ग येथील असून तो सावंतवाडीच्या एसपीके कॉलेजमध्ये प्रथम वर्ष बीएससी मध्ये शिकत असून तो एनसीसीच्या राज्यस्तरीय कॅम्प मध्ये सहभागी झाला होता. त्याची शूटिंगची आवड लक्षात घेता त्याची निवड एनसीसी इंटर ग्रुप शूटिंग चॅम्पियनशिप 2026 राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती. त्याने आपली निवड सार्थ ठरवत सदर स्पर्धेमध्ये थ्री पोझिशन 50 मीटर रायफल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल वर नाव कोरले यापूर्वी त्याने दहा मीटर एयर पिस्टल या प्रकारामध्ये राज्यस्तरावर पदक पटकाविली तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये देखील पदके पटकावलेली आहेत
साहीश तळणकर हा उपरकर शुटिंग अकॅडमी सावंतवाडी येथे नियमित सराव करतो. त्याला प्रशिक्षक श्री कांचन उपरकर ( सावंतवाडी) तसेच श्री इंद्रजीत मोहिते (कोल्हापूर) तसेच नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार श्री. विक्रम भांगले या सर्वांचे मार्गदर्शन लाभले . १९ जुलै ते ०३ ऑगस्ट दरम्यान तिरुचिलापल्ली केरळ येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी साहीशची निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून साहीशचे कौतुक केले जात आहे.


