अखेर आंबोलीतील धबधबे प्रवाहीत… आता वाहतूक कोंडी टाळण्याची कसोटी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
कोंकणात पावसाने जोर धरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाळी पर्यटनाचे केंद्र असलेल्या आंबोलीतील धबधबे प्रवाहीत झाले आहेत.
आंबोली ,चौकुळ,गेळे, केगदवाडी, गावांत पडत असलेल्या पावसामुळे आंबोली घाटातील धबधबे प्रवाहीत झाले आहेत. मुख्य धबधबाही ब-याच अंशी प्रवाहीत झाला असल्याने पर्यटक खूष झाले असून स्थानिक व्यापारीही आनंद व्यक्त करीत आहेत.
दरम्यान आंबोली वर्षा पर्यटन हे केवळ कोंकण, गोव्यापुरतेच राहीले नसून कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, आणि महाराष्ट्रातून हजारो पर्यटक येत असतात. शनिवारी, रविवारी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी होते. कोल्हापूर, बेळगांव ला जाणारा महामार्ग असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या दिवशी अवजड वाहतूक सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावी तसेच आंबोली भागातून घाटात येणा-या पर्यटकांच्या गाडया आंबोलीतच पार्कींग करण्यास सांगून माफक दरात रिक्षा, वनविभागाची गाड्यांनी धबधब्यांवर ने आण करावी जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही अशी मागणी होत आहे.


