मावळात मुसळधार…. लोणावळ्याचा भूशी डॅम ओव्हरफ्लो
पुणे/ वृत्तसंस्था
आठवडाभरापासून दमदार आगमन केलेल्या मान्सूनमुळे लोणावळा खंडाळ्यासह मावळातील डोंगररांगा हिरवाईने नटल्याचे पाहायला मिळत असुन, सर्वत्र डोंगर दऱ्यातून धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. पर्यटकांचे सर्वात आकर्षण असलेले भुशीडॅमही अखेर ओसंडून वाहू लागले आहे. भुशीडॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांसह पर्यटनावर विसंबून असलेल्या पर्यटन स्थळांवरील व्यावसायिकांची प्रतीक्षा आता संपली असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळा, खंडाळा व मावळात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. या पावसाने इथला निसर्ग अक्षरशः नटून गेलाय. सह्याद्रीच्या पर्वतरांगा धुक्यात हरवल्या आहेत. पावसाच्या संततधारीमुळे छोट मोठे धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. आता निसर्ग इतका बहरल्याने पर्यटक आणि ट्रेकर्संच्या गर्दीने लोणावळा व मावळातील परिसर फुलू लागला आहे. पोलीसांनी योग्य नियोजन केले आहे. धोकादायक ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे.


