कोंकणासह पश्चिम महाराष्ट्रात तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा…. पालघर, ठाणे जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी
मुंबई / वृत्तसंस्था
राज्यासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे असणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आणि गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरातही ४ ते ६ जुलै या कालावधीत मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सतर्क राहावे. या कालावधीमध्ये नागिरकांनी विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे


