खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषदेचा पुढाकार कौतुकास्पद; राजेसाहेब खेमसावंत भोंसले
सिंधुदूर्ग / राजू तावडे
सावंतवाडीतून अनेक खेळाडू क्रीडा क्षेत्रात घडले असून त्यांनी राज्यात व देशात शहराचा नावलौकिक प्राप्त केला आहे. येथील खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी केले.
सावंतवाडी नगरपरिषदेकडून पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चा शानदार शुभारंभ आज शनिवारी करण्यात आला. यावेळी राजेसाहेब भोसले बोलत होते.
नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानाकडील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये राजेसाहेब खेमसावंत भोंसले आणि राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्हाभरातून जवळपास ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या चषकाअंतर्गत कॅरम, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा विविध इनडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले की, या भव्यदिव्य नगराध्यक्ष चषकाच्या माध्यमातून रामराजा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे मोठे कार्य होत आहे. यासाठी त्यांनी क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांचे विशेष कौतुक केले. तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी बापूसाहेब महाराजांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासह स्थानिक क्रीडा गुणांना हक्काचे व्यासपीठ व वाव देण्याचे काम यानिमित्ताने होत असल्याचे उद्गार काढले.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, शालेय अभ्यासक्रमासह खेळात निपूण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या चषकाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा जोपासण्याचा नगरपरिषदेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. दरम्यान, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी देखील आयोजकांच्या संकल्पनेचे कौतुक करत स्पर्धक विद्यार्थ्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, महिला सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेवक दुलारी रांगणेकर, निलम नाईक, ॲड. सायली दुभाषी, सुकन्या टोपले, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देवा टेमकर, सुनिता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक यांच्यासह चित्रकार अक्षय सावंत, संतोष मोरजकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित व इतर नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी केले. सूत्रसंचालन गजानन परब यांनी केले, तर उपस्थितांचे आभार क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांनी मानले.


