सावंतवाडी वकील संघटनेच्या एकीचा मला अभिमान; ॲड. संग्राम देसाई
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन निवडणुकीच्या वेळी माझ्या विरोधात अनेक षडयंत्रे रचवण्यात आली. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एकीचे बळ दाखवले. सावंतवाडी वकील संघटनेची एकी हि वेगळीच आहे. याचा मला अभिमान आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी केले.
सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने आज शनिवारी सावंतवाडी वकील संघटनेच्या चेंबर मध्ये ॲड. संग्राम देसाई त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ॲड. संग्राम देसाई यांचा शाल व श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
ॲड. देसाई म्हणाले, निवडणूक प्रचारा दरम्यान सावंतवाडी मध्ये बाहेरची व्यक्ती येऊन माझ्या विरोधात वकिलाना भडकवत होती. पण सावंतवाडीतील सर्व वकीलांनी आपल्या एकजुटीच्या बळावर त्या व्यक्तीचे षडयंत्र हाणून पाडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मला सावंतवाडीतून मिळाले. त्यामुळे मी सावंतवाडीच्या सर्व वकील बांधवांचा ऋणी आहे. असेच एकीचे बळ कायम ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांच्या हिताच्या दृष्टीने मी काम करणार आहे असे आश्वासन यावेळी ॲड. संग्राम देसाई यांनी दिले.
या प्रसंगी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. सुभाष पणदूरकर, तालुका अध्यक्ष ॲड. बालाजी रणशूर व तालुका बारचे बहुतांश सदस्य उपस्थित होते.


