नागपूरात एकाच कुटुंबातील पाच जण गायब… पुण्यात शेवटचे लोकेशन
नागपूर/ प्रतिनिधी
उपराजधानीतील धंतोली उपनगरात राहणारे एक पाच जणांचे कुटुंब गेल्या ११ दिवसांपासून गायब असून त्यांचे शेवटचे लोकेशन पुण्यात दाखवत आहे. कर्जाचा बोजा वाढल्याने हे कुटुंब गायब झाले असल्याचे समजते मात्र आता त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी बरेवाईट करून तर घेतले नसेल ना ? या तणावात त्यांचे नातेवाईक आहेत
धंतोली परिसरात ७१ वर्षीय श्यामसुंदर परसवानी हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्याच घरात त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांचे कुटुंबही वास्तव्यास आहे. २४ जून रोजी सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील पाचही सदस्य कोणालाही काहीही न सांगता घरातून अचानक निघून गेले. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली, मात्र कोणाचाही काहीही सुगावा लागला नाही. अखेर हताश होऊन श्यामसुंदर परसवानी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२ वर्षे), इशिता परसवानी (वय ४० वर्षे), खुशी परसवानी (वय २१ वर्षे), कृष्णा परसवानी (वय १२ वर्षे) अशी बेपत्ता असलेल्यांची नांव आहेत.


