उत्तर गोव्यात चक्रिवादळाचा फटका… झाडे उन्मळून लाखोंचे नुकसान
पणजी/ प्रतिनिधी
गोव्यात वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळलीत. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
काल संध्याकाळी उशिरा झालेल्या वादळी पावसामुळे सत्तरी तालुक्यातील ब्रम्हकरमळी,खडकी,भेडशीवाडा,म्हाऊस ,धामसे ,पाडेली,भुईपाल,दाबे,हेदोडे या गावांना मोठा फटाका बसला. घराची कौले उडून गेलीत तर काही ठिकाणी घरांवर झाडे कोसळलीत.तर डिचोलीत मार्केटचे पत्रे उडून व्यापा-यांचे नुकसान झाले आहे.
या शिवाय पर्वरीत,उसगाव, साखळी,दवर्ली, बाणावलीसह अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याचा घटना घडल्या आहेत. नार्वेतील सप्त कोटेश्वर मंदिर जवळ उभ्या जीपवर झाड कोसळले.वाळपईत ढावे भागात ट्रान्सफॉर्मरवर झाड कोसळून आग लागल्याने विद्यूत पुरवठा बंद होता.
राज्यात सर्वाधिक पाऊस साखळीत ९१.६ मि.मी, वाळपई ८५, पेडणे ६४, म्हापसा ६४, फोंडा ४५.८, पणजी २२.२ मि.मी . पावसाची नोंद ५ जूलै सकाळी ८.३० पर्यंत नोंदवली गेली होती.


