वारंवार वीज खंडित व सक्तीच्या स्मार्ट मीटरविरोधात उद्या सावंतवाडीत धरणे आंदोलन
सावंतवाडी, दि. ६ जुलै : सावंतवाडी तालुक्यात वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करत वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.
हे आंदोलन मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता महावितरण कार्यालय, सावंतवाडी येथे होणार असून, तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आंदोलनात जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष गणेश बोर्डीकर, तावडे, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुधा कवठणकर तसेच पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय सावंतवाडी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांनीही आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनातून वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे तात्काळ थांबविणे आणि ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया बंद करणे, या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
“वीज हा आमचा हक्क आहे. ग्राहकांवर अन्याय होऊ देणार नाही,” अशी भूमिका जिल्हा वीज ग्राहक संघटनेने व्यक्त केली असून, मळगाव पंचक्रोशीसह संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वीज ग्राहक संघटना, सावंतवाडी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे


