नवी मुंबईत बेफान कार चालकाने अनेकांना उडविले… दोघांचा मृत्यू
नवी मुंबई/ वृत्तसंस्था
नवी मुंबईतील तळोजा सेक्टर १० परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावरील नागरिकांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सुमारे ८ ते १० जणांना कारने उडविल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. फरार चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


