साता-यातील फलटण जवळ विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
सातारा/ वृत्तसंस्था
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे एक मनाला लागणारी दुर्दैवी घटना घडली. घरासमोरील विजेच्या खांबावर असणारी केबल वायरच्या सपोर्ट तारेत करंट उतरला आणि या तारेचा धक्का शिंदे कुटुंबातील मुलीला लागला. तिची किंकाळी ऐकून वाचवण्यासाठी, तिचे आई-वडील, भावाने बाहेर धाव घेतली, मात्र त्यांनाही शॉक लागल्याने, एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या मुलीसोबतच आई, वडील आणि भाऊ देखील विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले आणि पाहता पाहता एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
सतीश शिंदे (वडील), गंगुबाई शिंदे (आई), आरती शिंदे (मुलगी) आणि सचिन शिंदे (मुलगा) अशी जागीच मृत पावलेल्या दुर्दैवी सदस्यांची नावे आहेत. या भीषण दुर्घटनेतून सचिन यांचा मोठा भाऊ सागर आणि त्यांची पत्नी सुदैवाने बालंबाल बचावले. तसेच मयत सचिन शिंदे ची पत्नी आणि साडेतीन वर्षाचा लहान मुलगा देखील बचावला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून प्रचड हळहळ व्यक्त होत आहे.


