यशवंतपूर बिकानेर रेल्वेमध्ये सोलापूर जवळ दरोडा
सोलापूर / वृत्तसंस्था
सोलापूरजवळ ट्रेनवर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर पहाटेच्या सुमारास थरारक दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी महिलांसह प्रवाशांना मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.”
तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटे दरोडा पडला. पहाटे २.४९ ते ४.०३ या कालावधीत ट्रेन तब्बल ७४ मिनिटे स्थानकावर उभी होती. हीच संधी साधून ४ ते ६ अज्ञात दरोडेखोरांचा रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रवेश केला. एस-४,एस-६ आणि एस-७ डब्यांतील प्रवाशांना दरोडेखोरांनी लक्ष्य केलं. महिलांसह प्रवाशांना मारहाण करून रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले. यावेळी विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले”
या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर सोलापुरात उपचार सुरू आहेत. सोलापूरचे महेश पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे ५ तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावण्यात आली. चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे १ लाख ४३ हजार ५०० रुपये इतकी आहे. अन्य तीन प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि मौल्यवान साहित्य चोरट्यांनी लंपास केले. दरोडेखोरांनी काही ठिकाणी खिडक्यांमधून हात घालून, तर काहींनी थेट डब्यात घुसून लूट केली.”
या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची धावपळ झाली. या दरोड्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. सर्वजण घाबरून होते. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अज्ञात दरोडेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास सोलापूर रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


