सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची आज सावंतवाडीत तातडीची निर्णायक सभा.
सिंधुदुर्ग/ मनोज घाटकर
सावंतवाडी, दि. १३ जुलै २०२६ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज, सोमवार दि. १३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे तातडीची व निर्णायक सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ४ हजार वीज ग्राहकांपैकी एक लाखाहून अधिक ग्राहकांना बसविण्यात आलेल्या स्मार्ट वीज मीटरसंदर्भातील विविध तक्रारींवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
संघटनेकडे प्राप्त झालेल्या अनेक लेखी व तोंडी तक्रारींनुसार, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर मोठ्या संख्येने ग्राहकांनी वीज बिलामध्ये लक्षणीय वाढ झाल्याची तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या अडचणी, तक्रारी व पुढील संघटनात्मक भूमिका याबाबत या बैठकीत सविस्तर विचारविनिमय करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्मार्ट मीटरमुळे प्रभावित वीज ग्राहक, सर्व सन्माननीय सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी तसेच संबंधित नागरिकांनी आपल्या लेखी तक्रारींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय लाड व सचिव श्री. साईनाथ आंबेरकर यांनी केले आहे.


