सीजेपी आंदोलन ….. सदाभाऊ खोतांनी आतंकवादी म्हटले तर… गोव्यात सावरकरांनी वाळवीची उपमा दिली
पणजी / वृत्तसंस्था
काँग्रेसच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोव्यात झालेल्या आंदोलनानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर यांनी काँग्रेसला “वाळवी” असे संबोधणारी पोस्ट सोशल मीडियावर केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. या पोस्टवर नागरिक आणि विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाढता विरोध पाहता सावईकर यांनी काही वेळातच संबंधित पोस्ट सोशल मीडियावरून हटवली.
या प्रकरणानंतर काँग्रेसनेही भाजपवर जोरदार पलटवार केला. काँग्रेसने सावर्डेकर यांना लक्ष्य करत, “भाजप म्हणजे कॅन्सर” अशी टीका केली. काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी सावर्डेकर यांनी २४ तासांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सोशल मीडियावर “काँग्रेस इज द टर्माइट्स! सेव्ह द नेशन!” असा मजकूर पोस्ट करत भारताच्या नकाशाला वाळवी पोखरत असल्याचे चित्र प्रसिद्ध केले होते. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात टीका आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी ती पोस्ट हटवली.
मात्र, पोस्ट हटवली असली तरी सावईकर यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत “मी केलेल्या पोस्टमध्ये काहीही गैर नाही,” असे स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू झाली आहे


