मोरजीत तेमवाडा येथे घरावरील कारवाईच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न
पेडणे/ प्रतिनिधी
मोरजीण तेमवाडा परिसरात घरावर होणाऱ्या कारवाईच्या मानसिक तणावातून एका रहिवाशाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेमवाडा येथील रहिवासी आर. हळणकर यांनी आपले घर पाडले जाणार असल्याच्या धक्क्यातून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांचे प्राण वाचले. घटनेनंतर काही काळ त्यांच्या घराजवळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, तेमवाडा समुद्रकिनारी भागातील जमीनमालक आर हळदणकर यांनी सीआरझेड (CRZ) नियमांचे उल्लंघन करून व्यावसायिक बांधकामे उभारण्यात आल्याची तक्रार संबंधित विभागाकडे केली होती. हे प्रकरण हरित लवाद (NGT) आणि त्यानंतर उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित २३ लहान-मोठ्या बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये आर. हळणकर यांच्या घराचाही समावेश आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, हळणकर यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून त्या परिसरात राहत आहे. पूर्वजांचे घर त्याच भागात असून, त्याच जागेजवळ त्यांनी कष्टाने नवीन घर उभारले होते. या घरात ते आपल्या विशेष गरजा असलेल्या मुलासह वास्तव्यास आहेत. तसेच आर. हळणकर हे वन खात्यात कार्यरत असल्याची माहितीही समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून घरावरील कारवाईमुळे ते तीव्र मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. अखेर या तणावातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर हळणकर यांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे भावनिक आवाहन केले आहे. पूर्वजांचे घर वाचवण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “आज पोलिसांनी त्यांना वाचवले; मात्र भविष्यात काही अनुचित घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवालही कुटुंबीयांनी उपस्थित केला


