महावितरणच्या दडपशाहीला न जुमानता संघर्ष अधिक तीव्र; २० ऑगस्टपर्यंत जनहित याचिका, १० हजार तक्रारी व २५ हजार सामूहिक अर्ज दाखल करण्याचा निर्धार.
सावंतवाडी, दि. २६ जुलै २०२६
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची तातडीची बैठक आज सावंतवाडी येथे जिल्हाध्यक्ष संजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्मार्ट मीटर, ग्राहकांच्या तक्रारी आणि महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत संघटनेने चार महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर केले.
बैठकीत सर्वप्रथम महावितरण सिंधुदुर्गने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीचा तीव्र निषेध करण्यात आला. ग्राहकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्यांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, कोकणसाद चॅनेलचे संपादक सागर चव्हाण तसेच संघटनेचे माजी जिल्हा सचिव व सामाजिक कार्यकर्ते दीपक पटेकर यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना ठामपणे उभी राहील, तसेच त्यांना आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत दिली जाईल, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत १० ऑगस्टपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून २० ऑगस्टपर्यंत कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट मीटर व वीज ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ही कायदेशीर लढाई निर्णायक ठरेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तिसऱ्या ठरावानुसार, महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) समोर मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल करण्याची तयारी सुरू असून, मंचाचे अध्यक्ष प्रशांत पुजारी पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. त्या दिवशी २ ते ३ हजार तक्रारी एकाच दिवशी दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ऑगस्ट अखेरपर्यंत एकूण १० हजार तक्रारी दाखल करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या मोहिमेत तालुका व जिल्हा संघटना, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व विविध लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
चौथ्या ठरावानुसार,जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक संरक्षण परिषदेकडे १० ऑगस्ट रोजी तब्बल २५ हजार स्मार्ट मीटर तक्रारी सामूहिकरित्या दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्राहकांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. या तक्रारींवर पुढील सुनावणी व कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीत राज्यातील विधानसभा व विधानपरिषदेत वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या ३२ आमदारांचे अभिनंदन करण्यात आले. विशेषतः विद्यमान आमदार मा. निलेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील वीज ग्राहकांचे प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला.
संघटनेने स्पष्ट केले की, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा आणि पारदर्शक वीज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटना शेवटपर्यंत कटिबद्ध राहील.
त्यावेळी बैठकीस उपस्थित संजय लाड (जिल्हाध्यक्ष), ॲड. नंदन वेंगुर्लेकर (जिल्हा समन्वयक), सुभाष गोवेकर,ऍड. समीर वंजारी, चंद्रकांत घाटे, महेश खानोलकर, नागेश आरोसकर [अध्यक्ष- ओरोस वीज ग्राहक संघटना, तारकेश सावंत, राजेंद्र प्रभाकर मसुरकर, मनोज घाटकर, विजय देसाई, अनंत जाधव, संतोष तावडे[ अध्यक्ष- सावंतवाडी], शिवा गावडे, पुंडलिक दळवी [ व्यापारी महासंघ उपाध्यक्ष], गणेश बोर्डेकर [ जिल्हा उपाध्यक्ष], समीर शिंदे, दीपक पटेकर, प्रमोद राऊळ, संजय गावडे [ वेंगुर्ला तालुकाध्यक्ष], सुभाष दळवी [ दोडामार्ग तालुका अध्यक्ष ] नंदकुमार लिंगवत, राजेंद्र सावंत, सचिन हरमलकर, साहिल बावकर, प्रमोद राऊळ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


