गगनबावडा तहसीलदार प्रशासकीय इमारतीतील महसूल शाखेला भीषण आग; ११ संगणकांसह लाखोंचे नुकसान
कोल्हापूर/
गगनबावडा तहसीलदार प्रशासकीय इमारतीतील महसूल शाखेत आज रविवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत तहसीलदारांच्या केबिनसह महसूल शाखेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलवरील ११ संगणक, प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर, वायरिंग, पंखे तसेच अन्य कार्यालयीन साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रविवार असल्यामुळे तहसील कार्यालय पूर्णपणे बंद होते. त्यामुळे कार्यालयात कोणताही कर्मचारी, शिपाई, पहारेकरी किंवा सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कार्यालय बंद असल्याने आग नेमकी किती वाजता आणि कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास धूर येत असल्याचे आल्यानंतर या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच तहसीलदार रुपाली सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी मौसमी चोगले यांच्यासह अन्य अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कार्यालयाला कुलूप असल्याने आत प्रवेश करणे शक्य नव्हते. त्यामुळे काच फोडून खिडक्या उघडण्यात आल्या. धुराचे प्रमाण कमी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करून नुकसानीचा प्राथमिक पंचनामा केला.
या आगीत तहसीलदारांचे केबिन, महसूल शाखेतील ११ संगणक, प्रिंटर, फर्निचर, विद्युत वायरिंग, पंखे आणि इतर कार्यालयीन साहित्य पूर्णपणे जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. आग लागण्यामागील कारण आणि एकूण नुकसानीचा सविस्तर अहवाल तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


