न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ठाकर लोककलांचा वारसा टिकविण्यासाठी युवकांनी पुढे यावे; चित्रकथी कलाकार बाळकृष्ण मसगे 

 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

  तुटपुंज्या उत्पन्नामुळे ठाकर समाजातील नव्या पिढीची उदासिनता, कलाकारांची कमी होत असलेली संख्या यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूषण असलेली ठाकर लोककला अस्तंगत होण्याच्या टप्प्यावर आहे. ही कला टिकायची असेल तर सर्वच समाजातील युवकांनी पुढे येऊन या कलांचे प्रशिक्षण घेऊन या प्राचीन कलांचा वारसा लोकांपर्यंत नेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन युवा चित्रकथी कलाकार बाळकृष्ण मसगे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथे केले.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाच्या सतराव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्री. मसगे यांनी दोन तासांहून अधिक काळ रसिकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर उपस्थित होते. अत्यंत प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्लाखान राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. मुंबरकर यांच्याहस्ते श्री. मसगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी मीरा मसगे यांचा सत्कार ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्याहस्ते करण्यात आला.

सुरुवातीला ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष व ‘आम्ही साहित्यप्रेमी’ उपक्रमाचे समन्वयक सतीश लळीत यांनी श्री. बाळकृष्ण मसगे यांचा परिचय करुन देतानाच ठाकर समाजाच्या चित्रकथी, लेदर पपेटस्, कळसुत्री बाहुल्या, पांगुळबैल, सांकेतिक भाषा आदी कलांबाबत माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राचीन वारसा असलेल्या या कला पुढेही टिकून रहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री. मसगे म्हणाले की, प्रतिष्ठेचा असा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावर एकदिड महिना होत आला आहे. मात्र ही दखल पहिल्यांदा ‘घुंगुरकाठी’ने घेतली आणि माझा पहिला सत्कार केला. लोककला आणि कलावंतांकडे पहाण्याची समाजाची मानसिकता यातून स्पष्ट होते. एकीकडे शासनाकडुन पुरस्कार मिळत आहेत. माझे वडील श्री. गणपत मसगे यांनाही २००५ साली तत्कालिन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याहस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. मात्र असे असले तरी आज ठाकर लोककलांची स्थिती फारशी चांगली नाही. कमी उत्पन्नामुळे युवा पिढीची मानसिकता नोकरी, कामधंदा करण्याकडे आहे. यामुळे नवीन कलाकार घडवणे हे मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी या कलाकारांचे कौतुक करुन या प्राचीन लोककला प्रतिकुल परिस्थितीत टिकविण्याचे आव्हान उत्तमपणे पेलत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री. मनोहर सरमळकर यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे