मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटना स्थापन ….. अध्यक्षपदी रमाकांत नाईक, उपाध्यक्ष अशोक शिरसाट
सिंधुदुर्ग / राजू तावडे
मळेवाड बाजारपेठेतील व्यापारी व दुकानदारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेची स्थापना करण्यात आली. यानिमित्त जकात नाका बाजारपेठ परिसरातील व्यापारी व दुकानदारांची बैठक पार पडली. या बैठकीत
संघटनेच्या अध्यक्षपदी रमाकांत नाईक, उपाध्यक्षपदी अशोक शिरसाट, सचिवपदी मदन मुरकर आणि खजिनदारपदी दिपक नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रमाकांत नाईक म्हणाले, “मळेवाड बाजारपेठेतील व्यापारी व दुकानदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवून व्यापाऱ्यांचे हित जपण्याचे काम केले जाईल.”
संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी गुरुप्रसाद नाईक, कमलाकर राऊत, नंदकिशोर नाईक, संतोष गावडे, रवींद्र तळवणेकर, अशोक परब, मनीष केरकर, उमेश कारुडेकर, सुनील नाईक, ज्ञानेश्वर तुळसकर आणि अक्षय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यकारिणी निवडीच्या बैठकीस जकात नाका बाजारपेठ परिसरातील व्यापारी व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे तसेच सर्व व्यापारी दुकानदार बंधूंनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


