न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

३० वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंधुदुर्गनगरीत सातबारांचे लोकार्पण…. पुढील पाच वर्षांत शहराचा कायापालट करणार -पालकमंत्री नितेश राणे

 

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर

तब्बल तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गनगरीतील नागरिकांच्या हक्काच्या जमिनीचा सातबारा अखेर त्यांच्या नावावर देण्याचा ऐतिहासिक क्षण सोमवारी साकार झाला. या निमित्ताने झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरीचा सर्वांगीण विकास हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगत, पुढील पाच वर्षांत जिल्हा मुख्यालयाचा कायापालट करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करू, अशी ग्वाही दिली. तसेच सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची घोषणा लवकरच होईल, असेही त्यांनी जाहीर केले.

नवनगर प्राधिकरण रहिवासी संघ, सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने आयोजित सातबारा लोकार्पण सोहळा सोमवारी (३ ऑगस्ट) शरद कृषी भवन येथे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष दादा साईल, तहसीलदार चैताली सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, पांडुरंग मालवणकर, परशुराम परब, प्राधिकरण संघाचे अध्यक्ष आदेश नाईक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसुली गावाचा दर्जा मिळाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या सातबारांचे वितरण यावेळी लाभार्थ्यांना करण्यात आले. सुमारे ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “सिंधुदुर्गनगरीवासीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आपल्या मालकीच्या जागेचा सातबारा स्वतःच्या नावावर असावा, ही प्रत्येकाची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली असून, याचे संपूर्ण श्रेय माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना जाते.”

ते पुढे म्हणाले, “जिल्हा मुख्यालय असल्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा विकास हा संपूर्ण जिल्ह्याच्या प्रतिमेशी जोडलेला आहे. त्यामुळे ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ या विचाराने शहराचा सर्वांगीण कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. अधिकारी नियमांचे कारण पुढे न करता विकासासाठी मार्ग काढतील. पुढील पाच वर्षांत सिंधुदुर्गनगरीचे रूप पालटून दाखवू. नगरपंचायतीची घोषणा लवकरच होईल आणि त्यानंतर आणखी एका ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार ठरू.”

प्रास्ताविकात नवनगर प्राधिकरण रहिवासी संघाचे अध्यक्ष आदेश नाईक यांनी तीन दशकांच्या संघर्षाचा आढावा घेतला. महसुली गावाचा दर्जा मिळाल्यानंतर सातबारा वितरणाचा टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या सकारात्मक पाठपुराव्यामुळे प्राधिकरणातील अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित समस्याही लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी हा दिवस सिंधुदुर्गनगरीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. अनेक वर्षांच्या सातबारासाठीच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे नमूद करत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कार्यकाळात विकासासाठी निधी मिळाला आणि पालकमंत्री नितेश राणे यांनीही शहराच्या विकासाला विशेष प्राधान्य दिल्यामुळे विकासकामांना वेग आल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी १९९९ पासून भूखंड वाटप सुरू झाले असले तरी सातबारा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून प्राधिकरणासाठी विविध माध्यमांतून निधी उपलब्ध झाल्याने पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगतानाच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदेश नाईक यांनी केले. स्वागत नवनगर प्राधिकरण रहिवासी संघाचे उपाध्यक्ष उल्हास पालव यांनी केले. सूत्रसंचालन राकेश नेमळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघाचे सदस्य संदीप गावडे यांनी मानले.

सोहळ्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘ओशाळला मृत्यू’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे