तिलारी पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्याबाबत सर्व्हेक्षण करा….पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश
सिंधुदुर्ग / राजू तावडे
माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार तिलारी प्रकल्पावरून आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा -२ पाणीपुरवठा योजना व तिलारी पाणीपुरवठा योजना ही सौर उर्जेवर कार्यान्वित करणे टप्पा -१ या योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करणेसाठीची बैठक नुकतीच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री नाम. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
सदर योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. सदर आदेशानुसार या योजनेचे प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याच्या अनुषंगाने मंत्री पाणीपुरवठा यांच्या मंत्रालयातील दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आणि पुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील, आमदार श्री. दीपक केसरकर, अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सदस्य सचिव,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि प सिंधुदुर्ग, मुख्य अभियंता,जीवन प्राधिकरण ठाणे, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल, सहाय्यक महाप्रबंधक, नाबार्ड पुणे, कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,सिंधुदुर्ग व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री महोदयांनी यांनी संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून येत्या पंधरा दिवसात नाबार्ड योजने अंतर्गत मंजुरीसाठी शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ब्राह्मणपाट, कुंभार्ली सोनुर्ली व न्हावेली इत्यादी व सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित योजनांबाबत सदर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. सदर गावांना व सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा समावेश वेंगुर्ला ते चिपी टप्पा २ अंतर्गत समावेश करून येत्या १५ दिवसात तसा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सदर योजनेमुळे या भागातील विविध उद्योगधंदे, हॉटेल व्यवसायिक पर्यटन व्यावसायिक यांना पाण्याची पुरेशी सोय होणार आहे. पर्यटनाला चालना मिळणार असून भविष्यात चिपी विमानतळचा विस्ताराच्या अनुषंघाने फायदा होणार आहे. मार्च ते मे मध्ये किनारपट्टी भागातील गावांना पाण्याची फार मोठ्या प्रमाणात कमतरता असते. या योजनेमुळे त्या गावांचीही पाण्याची गैरसोय दूर होणार आहे. तसेच या योजनेमुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता होणार आहे.


