सिंधुदुर्गच्या वीज प्रश्नांना मिळणार व्यासपीठ; १० ऑगस्टला ओरोसमध्ये जिल्हास्तरीय वीज परिषद
खंडित वीजपुरवठा, स्मार्ट मीटर, वाढीव बिले आणि पायाभूत सुविधांवर होणार चर्चा; गणेशोत्सवासाठी विशेष वीज नियोजनाची मागणी.
सिंधुदुर्ग | मनोज घाटकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी ओरोस येथे जिल्हास्तरीय ‘वीज परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत इच्छापूर्ती मंगल कार्यालय, RTO कार्यालयाजवळ, ओरोस येथे ही परिषद होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेला ग्राहक संघटना, लोकप्रतिनिधी, महावितरणचे अधिकारी, व्यापारी, शेतकरी, उद्योजक तसेच विविध सामाजिक व व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. वीज ग्राहक आणि महावितरण प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून आणत स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर चर्चा करण्याचा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
जिल्ह्यात सातत्याने उद्भवणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या, जुन्या व धोकादायक वीजवाहिन्या, जीर्ण लोखंडी खांब, गार्डिंगची अपूर्ण कामे, नवीन वीज जोडण्यांना होणारा विलंब, चुकीची किंवा वाढीव वीजबिले, ग्राहक सेवा आणि तांत्रिक अडचणी यासह विविध विषय परिषदेत मांडले जाणार आहेत.
तसेच स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या शंका व प्रश्नांवरही संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण घेण्यात येणार आहे. ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व स्थानिक पातळीवरील प्रत्यक्ष अडचणींचाही यावेळी आढावा घेतला जाणार आहे.
व्यावसायिक क्षेत्राच्या नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर
वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याचा सर्वाधिक फटका व्यापारी, लघुउद्योजक, हॉटेल व्यावसायिक, कोल्ड स्टोरेज, सेवा उद्योग आणि फळबागायतदारांना बसत आहे. वीज खंडित झाल्यामुळे व्यवसायातील कामकाज ठप्प होण्याबरोबरच उपकरणांचे नुकसान, माल खराब होणे आणि आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत.
या पार्श्वभूमीवर केवळ तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना कोणत्या करता येतील, यावर परिषदेत महावितरण प्रशासनासोबत चर्चा करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवापूर्वी वीज यंत्रणा सज्ज करण्यावर भर
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणने आगाऊ नियोजन करावे, अशी मागणीही परिषदेत करण्यात येणार आहे. संभाव्य बिघाड तातडीने दूर करण्यासाठी अतिरिक्त तांत्रिक कर्मचारी, आपत्कालीन दुरुस्ती पथके, आवश्यक विद्युत साहित्याचा पुरेसा साठा आणि प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध ठेवण्याबाबत चर्चा होणार आहे.
या परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, तेरखोल पंचक्रोशी वीज ग्राहक संघटना, ग्राहक पंचायत, सरपंच सेवा संघ, व्यापारी महासंघ व विविध व्यापारी संघटना, कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती, रिक्षा युनियन, शेतकरी संघटना, हॉटेल व्यावसायिक, फळ बागायतदार संघ तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर प्रशासन आणि ग्राहक प्रतिनिधींमध्ये सकारात्मक व विधायक संवाद निर्माण होऊन त्यातून ठोस उपाययोजना पुढे याव्यात, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, सचिव साईनाथ आंबेरकर आणि जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.


