वेदिका परब यांच्याकडून शाळेला वॉटर प्युरिफायर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
ग्रामीण भागात अनेक वेळा पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या समस्या टाळण्यासाठी आज मी शाळेसाठी वॉटर प्युरिफायर भेट देत आहे. आपणाला फक्त एक मशीन देत नाही, तर या मशीनमुळे आपल्या मुलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया घालत आहोत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिकाताई विशाल परब यांनी केले.
जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. १ येथे आयोजित वॉटर प्युरिफायर वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी सौ. वेदिका परब यांच्या हस्ते शाळेसाठी वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात आले, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
सौ. वेदिका परब म्हणाल्या, माझी मनापासून इच्छा आहे की, आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी निरोगी राहावा, चांगले शिक्षण घ्यावे आणि उद्या मोठे होऊन आपल्या गावाचे, आपल्या आई-वडिलांचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे. आमचा हा उपक्रम इथेच थांबणार नाही, पुढील काळातही अशाच सामाजिक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. या उपक्रमातून तब्बल ९६ विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपण उचलत आहोत, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. कारण निरोगी शरीरातच निरोगी विचार वाढतात आणि त्यातूनच देशाचा सक्षम नागरिक घडतो. असे त्या म्हणाल्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एकता एकनाथ नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुमित गोपाळ दळवी, श्री. रंगनाथ गवस, तसेच सर्व शिक्षकवर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.


