कॅथॉलिक पतसंस्थेला ३ कोटी ३५ लाखांचा नफा, १४ टक्के लांभाश जाहीर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेला या आर्थिक वर्षात ३ कोटी ३५ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला असून संस्थेने २८० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. पतसंस्थेने केवळ ३२ वर्षांच्या कार्यकाळात सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. स्थापनेपासूनची ऑडीट वर्ग “अ” ची परंपरा संस्थेने कायम राखली आहे. या वर्षी सभासदांना १४ टक्के लाभांश मंजुर करण्यात आला व लगेचच सभा चालू असतानाच लाभांश सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करण्यात आला.
सहकार क्षेत्रात विश्वासार्हतेचे आणि शिस्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३२ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे रविवारी अत्यंत उत्साहपुर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. पिटर दिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेने केवळ संस्थेच्या भक्कम आर्थिक प्रगतीची साक्ष दिली नाही तर सहकारातून समाजसेवेचा जो आदर्श, संस्थापक सहकार रत्न कै. पि. एफ. डॉन्टस यांनी निर्माण केला होता तो अधिक बळकट केला आहे.
या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून मिलाग्रीस चर्च सावंतवाडीचे पॅरीश प्रिस्ट फा. मिलेट डिसोजा उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. फा. मिलेट डिसोजा यांनी सिंधुदुर्ग डायोसिसचे सावंतवाडी येथील मिलाग्रीस कॅथीइल (चर्च) चे बांधकाम पुर्णत्वास नेल्याबद्दल व त्यांची दक्षिण डीनरीचे डिन म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या श्री. मायकल फ्रान्सिस डिसोजा कोलगाव, पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या श्री. मायकल कोजमा डिसोजा आंबोली, मालवण नगरपालीका नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सौ. अनिता गिरकर, राज्यस्तरीय पर्यावरणमित्र पुरस्कार प्राप्त निसर्गप्रेमी श्री. जोवेल डिसिल्व्हा, तसेच श्री.डाॅमणिक संतान डिसोजा असिस्टंट सब इन्स्पेक्टर उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन गौरविण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना फा. मिलेट डिसोजा म्हणाले, संस्थेने सर्व निकषांचे तंतोतंत पालन करत अत्यंत पारदर्शक कारभार केला आहे. यामुळेच संस्थेचा पाया अधिक भक्कम झाला आहे. त्यामुळे सर्व संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सभेचे सर्व विषय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. इतिवृत वाचन संस्थेचे सेक्रेटरी श्री. जॉनी फेराव यांनी केले तर अहवाल वाचन सरव्यवस्थापक श्री. जेम्स बॉर्जीस यांनी केले. सभेचे सुत्रसंचालन श्री फ्रॅन्की डॉन्टस यांनी केले. सभेला सर्व संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


