महसूलमंत्री बावनकुळे यांनी नेमलेली एसआयटी प्रामाणिकपणे काम करणार का ?…मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सरकार तर्फे अकृषित परवानग्या, जमीन खरेदी व्यवहार व शेतकरी दाखले तपासण्यासाठी नेमण्यात येणारी एसआयटी खरीच प्रामाणिकपणे काम करणार आहेत का? याबाबत जनतेच्या मनात शंका आहे कारण यापूर्वी जनतेचे अनुभव चांगले नाहीत.
समितींच्या सदस्यांनी खरोखरच पारदर्शकपणे काम केले तर जिल्ह्यातील अनेक जमीन घोटाळे उघडकीस येतील. जे जमीन घोटाळे यापूर्वी झाले आहेत, त्यांच्या स्वतंत्र फाईल मनसे तर्फे चौकशी समितीला दिल्या जातील. अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिली.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडच्या काळात जे जमीन घोटाळे उघडकीस आले आहेत, बोगस शेतकरी दाखले जोडून जी बेकायदेशीर खरेदीखते करण्यात आलेली आहेत, तसेच ज्या अकृषिक परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. जमीन खरेदी विक्री करणारे दलाल आज प्रत्येक गावात तयार झाले असून या व्हाईट कॉलर दलालांनी गरीब शेतकऱ्यांचा जमिनी कवडीमोल दराने परप्रांतील दनधांडग्या लोकांच्या घशात घातल्या आहेत. अनेक ठिकाणी जमिनी खरेदी करताना महसूल यंत्रणेला हाताशी धरून बोगस व खोटे शेतकरी दाखले जोडण्यात आलेले आहेत. असा आरोप श्री. केसरकर यांनी केला.
सर्वसामान्य माणसाला जर जमीन खरेदी अथवा विक्री करायची असेल तर अनेक त्रुटी काढणारे अधिकारी या परप्रांतीय खरेदीदार व्यक्तीच्या तालावर नाचत असतात. हे अधिकारी जमीन खरेदी व्यवहारात अनेक त्रुटी असताना देखील चुटकीसरशी व्यवहार पूर्ण करताना आढळून आलेले आहेत.
आपल्या गाव खेड्यात अनेक ठिकाणी सामाईक जमिनी आहेत. एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे व घरातील कर्ता पुरुष नोकरी धंद्यानिमित्त मुंबई किंव्हा अन्य ठिकाणी नोकरीला असल्यामुळे वारस तपास देखील रखडलेले आहेत. वारस तपास झालेले नसताना परस्पर अनेक जमिनींची खरेदीखते पूर्ण करण्यात आली आहेत. अनेक वेळा सातबारा उताऱ्यावर जमिनीच्या मालकाचे नाव असते. मात्र जमीन प्रत्यक्षात अन्य व्यक्तींच्या ताब्यात व वहिवाटीमध्ये असते, अशा वेळी जमिनींचे दलाल परस्पर जमीन मालकांना गाठून या जमिनी विकत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. अकृषित परवानग्या देताना सर्व नियम धाब्यावर बसवून या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. आपला गरीब शेतकरी न्यायाची लढाई पैशांअभावी लढू शकत नाही. याचाच फायदा हे परप्रांतीय जमीन खरेदीदार घेत आहेत. सासोली, उभादांडा वेंगुर्ला येथील शेतकरी देत असलेला लढा याचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळात यासर्व प्रकरणात जोरदार आवाज उठवून, सरकारला यासर्व जमीन खरेदी विक्री प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी नेमण्यास भाग पाडले. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विशेष आभार मानतो व जेव्हा हि चौकशी समिती जिल्ह्यात येईल, तेव्हा या चौकशी समितीला परप्रांतीय धनदांडग्या व्यक्तींनी सर्व नियम धाब्यावर बसवून महसूल व नोंदणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे जमीन खरेदी व्यवहार केले आहेत, त्याची कागदपत्रे सोपवली जातील. या संपूर्ण व्यवहारांची अतिशय पारदर्शीपणे चौकशी करण्याची मागणी केली जाईल. असे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.


