घोडगेवाडी नदीत वाहून गेलेल्या तरुण व चिमुकल्यास वैयक्तिक मदत करणार, आमदार दीपक केसरकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
दोडामार्ग तालुक्यातील घोडगेवाडी येथील फुलांवरून एक तरुण तसेच एक चिमुकला नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून या कुटुंबाला काहि आर्थिक मदत देण्यासाठीच आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला असून लवकरच या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत दिली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. तसेच याबाबत दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांच्याशीही चर्चा करून सरकारच्या पातळीवर काही मदत देता येईल का हे बघण्याच्या सूचनाही आमदार केसरकर यांनी केल्या. शुक्रवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दोडामार्ग येथील घोडगेवाडी पुलावरून झारखंड येथील एक तरुण तसेच सहा वर्षाचा चिमुकला नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. ही घटना घडवून चार दिवस उलटले. या चिमुकल्याचा मृतदेह मिळाला असून तरुण अद्याप बेपत्ता आहे. आजू बाजूच्या नदीच्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
या घटनेबाबत आमदार दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली असून यातील मृताच्या कुटुंबांना माझ्याकडून व्यक्तिगत सहाय्य केले जाईल, तसेच सरकारच्या पातळीवर ही तहसीलदार यांच्याशी चर्चा करून काही मदत देता येईल का हे पाहाण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या पुलावरून पाणी जात असताना ग्रामस्थांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.


