न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त, आरोग्यवर्धीनी समिती बैठकीत माहिती उघड 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त असून काही ठिकाणी तर आरोग्य कर्मचारी नाहीत त्यामुळे एखाद्या रुग्णाला तब्येत बरी नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. दोडामार्ग येथील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला पण तेथील पदेच भरण्यात आली नाहीत. मळेवाड रेडी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्याच्या सुविधा नाहित तर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन रूम आहे पण तेथील कर्मचाऱ्यांची भाषा फार उद्धट आहे. अशा तक्रारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आयोजित एकात्मिक आरोग्यवर्धीनी समितीच्या बैठकीत करण्यात आल्या.

ही बैठक शुक्रवारी आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण सभापती प्रितेश राऊळ याच्या उपस्थितीत बॅ. नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे पार पडली. यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा आरोग्य अधिकारी लळीत, सभापती सुश्मिता जाधव, तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, राहुल गुरव, वेंगुर्ले गटविकास अधिकारी व्ही.एन.नाईक, सुधीर आडीवरेकर, निलेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, विलास नाईक, राजेंद्र मसुरकर सविता टोपले उपस्थित होते.

बऱ्याच कालावधीनंतर पार पडलेल्या या सभेत आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य विषयक माहिती घेतली. या माहितीच्या आधारे त्यांनी आरोग्य केंद्रांच्या बाबतीत काही बदल सुचविले. कुंभवडे सह अन्य काही आरोग्य केंद्र जवळच्या आरोग्य केंद्राना जोडण्यात येणार असून त्याचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी मुख्यालया सुस्थितीत निवासस्थाने नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यालयात राहता येत नाही. तेथील निवासस्थानांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नसल्याने याचा सर्व भार बी एम एस डॉक्टरांवर येतो. त्यामुळे लवकरात लवकर एमबीबीएस डॉक्टर भरले जावेत अशी मागणी करण्यात आली.

आमदार केसरकर यांनी महात्मा फुले आरोग्य योजने बाबत यावेळी आढावा घेतला. तसेच आरोग्य केंद्राच्या बाबतीत ज्या काही त्रुटी आहेत, कर्मचारी संख्या कमी आहे याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ज्या सुविधा कमी आहेत त्या लवकरच भरल्या जातील. वेंगुर्ले येथे स्त्रीरोग तज्ञ नसल्याने तेथे प्रस्तुती होत नाहीत असे यावेळी आमदार केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले गेले.

शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी रूग्ण नेण्यात आला होता. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याने उध्दट उत्तर दिले हे शोभनीय नाही असे सुदन कवठणकर यांनी स्पष्ट केले. तसेच मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज व्हावे, अशी मागणी कवठणकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे