पोल्ट्री फार्ममधील ड्रग्स कारखाना उध्वस्त…चंदगड येथील घटना
कोल्हापूर / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हाजगोळी-सरोळी गावादरम्यानच्या शेतवडीतील पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेला एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज निर्मितीचा कारखाना अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केला. रविवारी रात्री करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सुमारे 208 ग्रॅम तयार एमडी ड्रग्स, त्याच्या निर्मितीसाठी लागणारी रसायने, प्रयोगशाळेसदृश साहित्य आणि विविध यंत्रसामग्री असा तब्बल 1 कोटी 13 लाख 51 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्य आरोपीसह पोल्ट्री फार्म मालक व अन्य संशयित अशा एकूण आठ जणांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने चंदगडसह कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा सीमाभागात मोठी खळबळ उडाली आहे
छाप्यात सुमारे 208 ग्रॅम वजनाचा तयार एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स आढळून आला. त्याचबरोबर ड्रग्स निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध रसायने आणि साहित्यही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. यामध्ये रासायनिक पावडर, सुमारे 70 लिटर रसायन, फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, घनतामापक, टेस्ट ट्यूब, काचेचे जार, इंडिकेटर पेपर, कापडी हँड ग्लोव्हज, स्पीड कंट्रोल रेग्युलेटर, मिक्सिंग मोटार, स्टँडिंग सेट आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा नेमका वापर कशासाठी केला जात होता, त्यातून किती प्रमाणात एमडी तयार करण्यात आले आणि या कारखान्यात यापूर्वी किती काळापासून निर्मिती सुरू होती, याचा तपास पथकाकडून करण्यात येत आहे.
कारवाईपूर्वी अमली पदार्थविरोधी पथकाने हाजगोळी-सरोळी परिसरात सलग चार दिवस गुप्तपणे पाहणी केली. पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीच्या वेळी होणाया संशयास्पद हालचाली, ये-जा करणाऱ्या व्यक्ती आणि वाहनांवर पथकाने बारकाईने लक्ष ठेवले. पुरावे व माहितीची खात्री झाल्यानंतर शनिवारी रात्री छापा टाकण्यात आला.
या कारवाईत मुख्य आरोपीसह पोल्ट्री फार्म मालक आणि अन्य संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तुडये परिसरातील दोन, हाजगोळीतील एक तसेच बेळगाव परिसरातील दोन जणांसह अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे. एकूण आठ संशयित ताब्यात असल्याचे सांगण्यात आले.
निर्मनुष्य ठिकाणाचा घेतला फायदा
हाजगोळी-सरोळी दरम्यानचा हा परिसर तुलनेने निर्मनुष्य असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकही होत नाही. स्थानिक शेतकरी शेताकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये नेमके काय सुरू आहे, याची पुसटशी कल्पनाही परिसरातील नागरिकांना नव्हती. याचा फायदा घेत ड्रग्ज निर्मितीचा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. पोल्ट्री फार्ममध्ये अमली पदार्थ तयार केला जात असल्याचे उघड झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
हाजगोळी हे कर्नाटक सीमेच्या जवळ असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बेळगाव हद्दीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून, जांबोटीमार्गे गोवा राज्याशीही संपर्क सुलभ आहे. त्यामुळे येथे तयार होण्राया एमडी ड्रग्जचा पुरवठा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांमध्ये केला जात होता का, याची दिशा तपासण्यात येत आहे.
ड्रग्जची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा पुरवठा, आर्थिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था आणि संभाव्य विक्री साखळी यांचा तपास पथकाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अन्य शहरांपर्यंत पोहोचण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 102/2026 अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम 8(क), 21(क), 22(क) तसेच बीएनएसमधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान सलीम खान (रा. मिरारोड, ठाणे), पोल्ट्री मालक पप्पू विठ्ठल मलतवाडकर याच्यासह इतर सहभागींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.



