मेळघाटात डोहात बुडून दोघांचा मृत्यू
अकोला/ वृत्तसंस्था
अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वतरांगातील मेळघाट परिसरात डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गिरीधर दाभाडे आणि कृष्णा झांबरे अशी मृत मुलांची नावे आहेत. मित्रांचा ग्रुप मेळघाटातील खटकाली भागात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी सर्वजण डोहात अंघोळीसाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गिरीधर आणि कृष्णा पाण्यात बुडाले. काही मित्र सुखरूप बचावले. अकोटपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.”


