भाजपच्या ‘सेवा अभियानात’ ३५० निवेदने प्राप्त : आमदार प्रमोद जठार
सिंधुदूर्ग/ राजू तावडे
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या ‘सेवा अभियाना’ला कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत आमदार प्रमोद जठार यांनी सांगून या अभियानाविषयी माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, दिलीप भालेकर, महेश धुरी, सुधीर आडीवरेकर, रवींद्र मडगांवकर, संतोष साखरे, दुलारी रांगणेकर, मधुकर देसाई आदी उपस्थित होते
नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून संपूर्ण सिंधुदुर्गातून ३५० हून अधिक निवेदने आली आहेत. OSD संतोष साखरे हे दरमहा समस्यांचा आढावा घेतील. महसुली प्रकरणांचा निपटारा ३ महिन्यांत करण्याचे निर्देश दिले आहेत. कोकणातील जमिनीच्या तुकड्यांमुळे उद्भवणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या अडचणींवर पालकमंत्री नितेश राणे तोडगा काढत आहेत.
औद्योगिक जमिनींचा ३ महिन्यांत नियोजित वापर न झाल्यास कारवाई होईल (उदा. सातार्डा उत्तम स्टील) तसेच सागरी गावांत अखंड विजेसाठी वीजवाहिन्या भूमीगत केल्या जातील. शिक्षक भरतीत ८०% बाहेरील उमेदवार येतात. हे पद स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेणार असल्याचे आमदार जठार यांनी सांगितले.
मनुस्मृती वादावरून राहुल गांधी व काँग्रेसवर टीका करत जठार यांनी, “बायबल आणि कुराणातील कुप्रथांवर बोलण्याची हिंमत काँग्रेस दाखवणार का?” असा सवाल उपस्थित केला.


