देवसू दाणोली अवैध बंदुका प्रकरणी ४ जणांना अटक
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील देवसू या गावात गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून अवैध बंदुका आणि खवले मांजराच्या खवल्यांसह इतर माल जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गजानन सावंत, अशोक सावंत, संतोष जाधव आणि सूरज सावंत या चारही आरोपींना अटक केली आहे.
सावंतवाडी पोलीसांनी देवसू आणि दाणोली परिसरात टाकलेल्या छाप्यात बेकायदेशीर ४ बंदुका आणि १.१३५ की.ग्रॅम वजनाची (एकूण १५४) खवले मांजराची खवले असा एकूण ७०,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पथकांनी देवसू व दाणोली गावात मंगळवारी ३ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली.
देवसू (पलीकडची वाडी) येथे गजानन उर्फ अर्जुन सावंत (वय ४२) याच्या घरावर छापा टाकून २०,००० रुपये किंमतीची १ ठासणीची बंदूक, १०,००० रुपये किंमतीची १ काडतुसाची बंदूक आणि १.१३५ ग्रॅम वजनाची (१५४ नग) खवले मांजराची लहान-मोठी खवले जप्त करण्यात आली.
दाणोली (गावठणवाडी) येथील अशोक लक्ष्मण सावंत (वय ६०) याच्या घरातून २५,००० रुपये किंमतीची १ ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली. तर देवसू (जाधववाडी) येथील संतोष विठ्ठल जाधव (वय ४२) याच्या घरातून २५,००० रुपये किंमतीची १ ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान ही बंदूक सूरज धर्मेंद्र सावंत (वय २९, रा. देवसू मधलीवाडी) याची असून त्याने संतोष जाधव याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी गजानन सावंत, अशोक सावंत, संतोष जाधव आणि सूरज सावंत या चारही आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्री. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, साहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील तसेच पोलीस अंमलदार निलेश परब, महेश निरवडेकर, ज्योती दुधवडकर, अमित राऊळ, संतोष गलोले, रामदास जाधव, मनिष शिंदे, सचिन चव्हाण, अमिता दळवी व पुजा भाटे यांच्या पथकाने केली.


