सावंतवाडी स्टॅण्डच्या बांधकामासाठी लवकर बैठकीचे आयोजन, मंत्री सरनाईक यांचे आमदार केसरकर यांना आश्वासन
सिंधुदुर्ग राजू तावडे
सावंतवाडी एस टी बस स्टॅण्डचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे, सावंतवाडी साठी उर्वरित नवीन एस टी बसेस गणेशोत्सवापूर्वी देण्यात याव्यात, सावंतवाडी बेळगाव मार्गे बेंगलोर आंतरराज्य एस टी बस सेवा तात्काळ सुरू करावी या मागण्यांसाठी आमदार दीपक केसरकर यांनी मंगळवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील एस टी संबंधी विविध समस्यांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. सावंतवाडी एसटी बस डेपोचे बांधकाम बीओटी तत्त्वावर मंजूर आहे. परंतु प्रशासनाकडून याबाबत दिरंगाई होत आहे. हे काम तात्काळ सुरू व्हावे यासाठी तातडीने संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी अशी मागणी आमदार केसरकर यांनी मंत्री सरनाईक यांच्याकडे केली.
नुकत्याच एसटीच्या पाच नवीन बसेस सावंतवाडीला प्राप्त झाल्या. त्याबद्दल मंत्री महोदयांचे आभार मानून शिल्लक राहिलेल्या १५ बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देणेबाबत विनंती त्यांनी केली.
सावंतवाडी परिसर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रवासी बेंगलोर पर्यंत ये जा करत असतात. यामध्ये स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरी धंद्या निमित्त बेंगलोर व परिसरात काम करणारे या भागातील नागरिकांना बेंगलोर येथे जाण्यासाठी थेट एस टी बस सेवेची सोय नाही. प्रवाशांना यासाठी बेळगावला किंवा पणजी मडगाव येथे जावे लागते. यामध्ये प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाया जातो. सावंतवाडी बेळगाव मार्गे बेंगलोर आंतरराज्य दैनंदिन एस टी बस सेवा सुरू केल्यास प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कर्नाटक राज्यातील बेंगलोर, तुमकूर, चित्रदुर्ग, दावेनगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड, बेळगाव या भागातील नागरिक या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ याच मार्गावर आहे. या गाडीला पुरेशा प्रमाणात भारमानही उपलब्ध होणार आहे. या भागातील प्रवाशांची सोय व्हावी म्हणून सावंतवाडी ते बेंगलोर व परत अशी आंतरराज्य दैनंदिन बस सेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी आमदार श्री.दीपक केसरकर यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. मंत्री महोदयांनी वरील तिन्ही विषयांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलेले आहे.


