मालवणात फायनान्स कंपनीत स्थानिकांचा झोल…
सिंधुदुर्ग राजू तावडे
मालवणी माणसाने केरळी लोकांना टोपी घालतानाच आपल्या माणसांना मुथ्थूट फायनान्स द्वारे कोटींचा फटका दिला आहे.
मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुथूट फायनकॉर्पच्या मालवण शाखेत ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शाखा मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाखा मॅनेजर स्नेहा निहाल जामसंडेकर, कॅशिअर तन्मय मंगेश पराडकर, कर्मचारी स्नेहल राजन आचरेकर आणि एजंट हर्षदा रमाकांत आडकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५), ३१६(५) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तक्रारीनुसार, जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत संशयितांनी ‘तोळ्यामागे दर आठवड्याला ५ हजार रुपये परतावा मिळेल’ अशी प्रलोभन दाखविणारी फसवी योजना ग्राहकांना सांगून जाळ्यात ओढले. मालवण शहर व परिसरातील सुमारे १२० नागरिकांचे ८,७९३ ग्रॅम वजनाचे सोने या योजनेत तारण म्हणून जमा करून घेण्यात आले.
मुथूट फायनकॉर्पमध्ये नागरिकांच्या खात्यावर जमा झालेल्या ६ कोटी ८२ लाख २७ हजार ७०३ रुपयांपैकी ६ कोटी ६४ लाख ८९ हजार ९३० रुपये संशयितांनी पुन्हा रोख स्वरूपात उकळले. त्याची कोणतीही अधिकृत पावती ग्राहकांना देण्यात आली नाही. ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या सोन्याचे दागिने इतर व्यक्तींच्या नावावर ठेवून योजनेची रक्कम ‘टॉपअप’ करण्यात आली. ग्राहकांच्या खात्यावर कमी रक्कम जमा करून पावतीवर मात्र जास्त रक्कम दर्शविण्यात आली.
संशयितांनी ग्राहकांना कमिशनच्या नावाने ५५ लाख २८ हजार ४१५ रुपये परतावा दिला, तर उर्वरित ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सुमारे १२० ग्राहकांचे कोट्यवधी रुपयांचे सोने व पैसे अडकले असल्याने या प्रकरणाने मालवणात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.