अंगठीची लाच…. कुडाळात स्वच्छता निरीक्षक ताब्यात…सावंतवाडीतील रहिवासी
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात ताब्यात घेतले. पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३) असे ताब्यात घेतलेल्या संशयित स्वच्छता निरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदाराने कुडाळ येथे ‘पद्मगड ज्वेलर्स’ नावाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नगरपंचायतीकडे ‘ना हरकत दाखला’ मिळण्यासाठी अर्ज केला होता. हा दाखला मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी १,२०० रुपये किमतीची नवीन खडा असलेली चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे २७ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी नाटेकर यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुडाळ नगरपंचायत कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून चांदीची अंगठी स्वीकारताना संशयित नाटेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली


