सावंतवाडीत ‘सोशल क्लब’वर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा दाखल
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील माठेवाडा येथील ‘आनंदी कृपा सोशल आणि स्पोर्ट क्लब’ या बंदिस्त इमारतीमध्ये सुरू असलेल्या रमी पत्यांच्या जुगार अड्ड्यावर सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी वाहनांसह एकूण ४,३६,३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस दीपक भैरू शिंदे व सहकाऱ्यांनी २८ सप्टेंबर रोजी दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास माठेवाडा येथील ‘आनंदी कृपा सोशल आणि स्पोर्ट क्लब’वर अचानक धाड टाकली. त्यावेळी तेथे आरोपी रोख रक्कम आणि पॉईंट स्वरूपात रमी पत्यांचा जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले.
याप्रकरणी रूपेश संभाजी सावंत (वय ४७, रा. माठेवाडा, सावंतवाडी), गौरव झिलु गावडे (वय ३६, रा. भटवाडी, सावंतवाडी),आकील इक्बाल बाडीवाले (वय ४५, रा. माठेवाडा, सावंतवाडी), पुंडलिक यशवंत सावंत (वय ७३, रा. ओवळीये, सावंतवाडी), जेरॉन बावतीस लॉड्रीक्स (वय ६४, रा. कलंबिस्त, सावंतवाडी), सुनील विष्णु सावंत (वय ५५, रा. सांगेली, सावंतवाडी), संतोष सुमंत राऊळ (वय ४८, रा. सांगेली, सावंतवाडी), संजय वसंत गोधावळे (वय ५६, रा. माठेवाडा, सावंतवाडी), शंकर शिवा सावंत (वय ३३, रा. कलंबिस्त, सावंतवाडी), प्रभाकर हरि कदम (वय ६८, रा. माणगाव, ता. कुडाळ), रामकृष्ण अशोक आडके (वय ४१, रा. कोलगाव, सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कारवाई दरम्यान जुगाराच्या टेबलावरील ३०,५०० रुपयांची रोख रक्कम, हिशोबाची वही, पत्यांचे कॅट, ११ विविध कंपन्यांचे मोबाईल हॅन्डसेट आणि ७ दुचाकी वाहने (टीव्हीएस जुपिटर, यामाहा स्ट्रीट रॅली, पॅशन प्रो, ॲक्टिव्हा इत्यादी) असा एकूण ४,३६,३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस सहाय्यक निरीक्षक हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धुरी हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कारवाईच्या वेळी पोलीस हवालदार कदम, शिंदे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक हजर होते.


