कुडाळ येथे इस्कॉनतर्फे ऑक्टोबरमध्ये भगवद्गीतेवर आधारित मार्गदर्शन
सिंधुदुर्ग / तेजस तेरसे
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे २ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मराठा मंडळ हॉल, कुडाळ येथे ‘यशस्वी व आनंदी जीवनासाठी भगवद्गीतेवर आधारित आत्मसाक्षात्कार याचे विज्ञान’ याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. मानस गौरांगदास हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘मी कोण आहे? मला सुखी व्हायचे असेल तर माझ्या विषयीचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मन, बुद्धी, अहंकार, आत्मा आणि पुनर्जन्म याविषयी चर्चा होणार आहे.
दुसऱ्या दिवशी ‘देव खरोखर अस्तित्वात आहे काय? भक्तीद्वारे आपण आपले जीवन आनंदी बनवू शकतो का? भगवंतांच्या अस्तित्वाचा आपल्याशी संबंध काय?’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भगवंतांशी असलेले आपले नाते आणि विविध देवी-देवतांचे स्वरूप याबाबतही माहिती दिली जाणार आहे.
तिसऱ्या दिवशी सुखाचा शोध, कर्माचे नियम व त्यातून सुटका, कुटुंब व व्यवसायात राहून भगवद्गीतेचे पालन, जगाचे स्वरूप आणि सुखाचा राजमार्ग या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी दुलाजी सावंत / दाऊजी बलराम प्रभूजी यांच्याशी 9665641509 संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे


