न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दीपक केसरकरांच्या विजयावर संशय, दादा भुसेंचा दौरा जमीन व्यवहारासाठी: डॉ. जयेंद्र परुळेकर 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण मतदारसंघात विरोधाचे तीव्र वातावरण असतानाही आमदार दीपक केसरकर एकतर्फी विजयी कसे झाले? असा थेट सवाल उपस्थित करत ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी त्यांच्या विजयावर आणि मतांच्या आकडेवारीवर तीव्र संशय व्यक्त केला आहे. २०२४ च्या निवडणुकीतील तिन्ही उमेदवारांची मते एकत्र केली तरी ती केसरकरांना मिळालेल्या एकूण मतांशी जुळत नाहीत, असा गंभीर दावा करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली आहे. या निवडणुकीत केसरकरांना नेमका कोणाचा आशीर्वाद होता, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

श्री. परुळेकर यांनी गुरुवारी सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक देवेंद्र टेमकर, बाळा गावडे, निशांत तोरसकर, शब्बीर मणियार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. परुळेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अचानक झालेल्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दादा भुसे यांचा हा दौरा खरोखरच शाळांच्या पाहणीसाठी होता की पडद्यामागून काही जमीन व्यवहार करण्यासाठी होता, असा संशय त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, आडाळी येथे मोठे उद्योग आणण्याच्या केवळ मोठ्या घोषणा करणाऱ्या उद्योगमंत्र्यांवर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. पालकमंत्री रोजगाराच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले असून केवळ घोषणाबाजीत व्यस्त आहेत. प्रत्यक्षात ठोस विकास आणि रोजगारनिर्मिती झालेली नसून बड्या लोकांना जमिनी मिळवून देणे हेच सत्ताधाऱ्यांचे मूळ ध्येय आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, देशभरात निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने व आंदोलने होत असताना, भाजप सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डॉ. परुळेकर यांनी केला. आता जनता स्वतः रस्त्यावर उतरली असून लवकरच भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल, असा दावा त्यांनी केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे