कोमसापच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे
सिंधुदुर्ग / राजू तावडे
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष माधव कदम यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली.
येथील शासकीय विश्रामगृहावर कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला शाखा सचिव निलेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य जेठे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले. उपस्थित सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला.
बैठकीला कोमसापचे कोकण समन्वयक प्रा. आनंद वैद्य, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, जिल्हा प्रतिनिधी संदीप वालावलकर, उपाध्यक्ष राजस रेगे, खजिनदार सिद्धेश खटावकर, रिमा भोसले, राजन भोसले आणि निकिता ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश जेठे यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी नोव्हेंबरमध्ये रत्नागिरी येथे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत होणाऱ्या साहित्य संमेलनाची जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले. तसेच साहित्य चळवळीत नव्या पिढीतील कवी आणि लेखकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याची सूचनाही केली.


