सिंधुदुर्गावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे; उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांचे नवदुर्गेला साकडे
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ओढवलेले दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, कोकणातील बळीराजाला समृद्धी लाभू दे आणि कोणत्याही संकटाशी सामना करण्याची ताकद मिळू दे, अशी प्रार्थना सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली. कोलगाव पांडवनगरी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या नवदुर्गेच्या चरणी त्यांनी हे साकडे घातले. दरम्यान, उपनगराध्यक्ष निरवडेकर यांना भविष्यात मोठी पदे मिळोत, असे गाऱ्हाणे मंडळाचे गटनेते बाबुराव चव्हाण यांनी श्री दुर्गादेवीच्या चरणी घातले.
ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपल्या सुविद्य पत्नी सौ. अनघा निरवडेकर यांच्या समवेत कोलगाव पांडवनगरी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे दर्शन घेतले व आरती केली. याप्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार सागर चव्हाण, कार्याध्यक्ष विजय चव्हाण यांच्यासह मंडळाचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडत आहे.


